मशिदीवरील अनाधिकृत भोंगे उतरवावे-मनसेचे निवेदन



कार्यवाही होत नसल्याने मनसे स्टाईल आंदोलन करणार

– सचिन डफळ

नगर – मशिदीवरील अनाधिकृत भोंगे उतरवणे व ध्वनीक्षेप क्षमता तपासून कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पोलिस अधिकारी यांना देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, सचिव संतोष साळवे, उपाध्यक्ष तुषार हिरवे, संदिप चौधरी, वाहतुक सेना अध्यक्ष अशोक दातरंगे, विभाग अध्यक्ष किरण रोकडे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी सचिन डफळ म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून मशिदीवरील अनाधिकृत भोंग्याबाबत प्रशासनास वेळोवेळी निवेदन, स्मरणपत्र देण्यात येत आहेत, परंतु त्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होतांना दिसत नाही. आज पुन्हा निवेदन दिले आहे. आता संबंधितांवर कारवाई व्हावी, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.

पोलिस अधिक्षकांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील काही महिन्यापुर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरवून कारवाई करणे बाबत आपणास निवेदन दिले होते. त्यावेळेस आपण केलेल्या कारवाईमुळे काही काळापुरता भोंग्यांचा आवाज कमी झाला होता, परंतु आता पुन्हा मशिदीवर अनधिकृत भोंगे लावण्यात आले आहेत. याबाबतच्या तक्रारी संपूर्ण नगर शहरातील नागरिकांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकार्‍यांकडे येत आहेत.

धर्माच्या नावाखाली वयोवृद्ध, रुग्ण, अशक्त व्यक्ती, लहान मुले आणि विद्यार्थी यांना भोंग्याच्या कर्कश आवाजामुळे होणार्‍या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे, त्या निर्णयात स्पष्ट सांगितलेले आहे की, रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कुठलाही ध्वनीक्षेप वापरता येणार नाही, प्रत्येक धर्मियांच्या सणांना तेवढ्या दिवसापुर्ती ध्वनीक्षेप लावण्याची परवानगी मिळेल, परंतु 365 दिवस परवानगी मिळणार नाही, ध्वनिक्षेपाची परवानगी रोज ध्यावी लागेल.

ध्वनीक्षेप किती क्षमतेने लावावा, त्याबाबतच्या मर्यादाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या आहेत. लोकवस्ती असेल त्या भागात कमीत कमी 10 डेसिबल व जास्तीत जास्त 45 ते 55 डेसिबल आवाजात ध्वनीक्षेप लावता येतो. देशातील सर्व धर्मियांना ध्वनीक्षेपामुळे होणार्‍या ध्वनी प्रदूषणाचा त्रास होता, मुळात हा विषय धार्मिक नसू सामाजिक आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही आपल्या पोलिस प्रशासनाची असून संपूर्ण नगर शहरातील सर्व मशिदीवरील अनाधिकृत भोंग्यांवर कारवाई करुन आपला पोलिसी खाक्या दाखवावा आणि शहरात कायद्याचं राज्य आहे, हे त्यांना दाखवून द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *