तहसील कार्यालयाच्या नुतन इमारतीमधुन शासनाच्या धोरणांची, योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नेवासा येथे उभारण्यात आलेल्या तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीमधून शासनाच्या धोरणांची, योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याबरोबरच सर्वसामान्यांची कामे वेळेत मार्गी लागून त्यांची अपेक्षापूर्ती व्हावी, अशी अपेक्षा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
नेवासा येथे तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकरझ अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, नितीन पाटील, दीपक पठारे आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,  समाजातील शेवटच्या घटकाचा सर्वांगिण विकास होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासन अनेकविध योजना राबवत आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हा मूलमंत्र घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा वेगाने विकास होत असल्याचेही ते म्हणाले.
शिर्डी व अहमदनगर येथे औद्योगिक वसाहतीसाठी  जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या काळात या वसाहतीमध्ये मोठं मोठे उद्योग येऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. नजीकच्या काळात अहमदनगर येथे भव्य अशा महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून या मेळाव्यासाठी ४०० ते ५०० कंपन्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. यातून जिल्ह्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असल्याचेही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
    संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या नेवासा येथे ज्ञानेश्वर मंदिर व परिसराचा विकास करण्याचा संकल्प केला असुन या ठिकाणी ज्ञानेश्वर सृष्टी निर्माणाचा आराखडा तयार करण्याच्या प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत. या विकास कामांसाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केले.
कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे अपघात योजनेंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश, कृषी विभागामार्फत लाभार्त्याना ट्रॅक्टरचे वितरण, उज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभाचे पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच   इमारतीसाठी जागा दिलेल्या शेतकऱ्यांचा पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *