नगर-मनमाड रस्त्यासंदर्भात  वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक

खा. नीलेश लंके यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट


नगर  :  प्रतिनिधी

     बहुचर्चीत नगर-मनमाड रस्त्याच्या रखडलेल्या दुरूस्तीसंदर्भात खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची मंगळवारी नवी दिल्ली येथे भेट घेतली. या रस्त्याच्या रखडलेल्या कामासंदर्भात गडकरी यांनी पुढील आठवडयात रस्ते वाहतूक मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलविण्यात आल्याचे खा. लंके यांनी सांगितले.

      नगर-मनमाड तसेच नगर-पाथर्डी या दोन्ही रस्त्यांची दुरावस्था झाल्याने त्यांची दुरूस्ती करण्याच्या मागणीसाठी खा. लंके यांनी मागील वर्षी उपोषण केले होते. त्यावेळी महाविकास आघाडीचे तत्कालीन नेते अजितदादा पवार यांनी उपोषणाच्या चौथ्या दिवशी नगर येथे येत शिष्टाई करीत हे आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले होते. त्यावेळी पवार यांनी थेट नितीन गडकरी यांच्याशी संपर्क करून लंके यांच्या या आंदोलनात तोडगा काढला होता. गडकरी यांनी पवार यांच्यासह लंके यांच्याशीही चर्चा करून विशेषतः नगर-पाथर्डी रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची ग्वाही दिली होती. व हे लगेच सुरू होऊन पुर्णही झाले होते. नगर-मनमाड रस्त्याचेही काम सुरू झाले मात्र ते पुन्हा थंडावल्याने नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
       लोकसभा निवडणूकीदरम्यान राहुरी मतदारसंघात नगर-मनमाड रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. खा. लंके यांच्याकडूनही या रस्त्याच्या दुरावस्थेस तत्कालीन खासदार डॉ. सुजय विखे हेच जबाबदार असून त्यांच्या घराकडे जाणारा रस्त्याही त्यांना करता आला नसल्याची टीका त्यांनी त्यावेळी वारंवार केली होती.
      दरम्यान, खा. नीलेश लंके हे संसदेमध्ये शपथ घेण्यासाठी गेले होते त्यावेळीही नितीन गडकरी यांची संसदेच्या आवारात त्यांची भेट झाली होती. त्याच वेळी लंके यांनी नगर-मनमाड रस्त्याच्या कामाविषयी गडकरी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावेळी गडकरी यांनी कार्यालयात येऊन त्यासंदर्भात निवेदन देण्याबाबत सुचित केले होते.
      गडकरी यांच्या सुचनेप्रमाणे खा. लंके यांनी नगर-मनमाड रस्त्यासंदर्भात त्यांच्या कार्यालयात जाऊन निवेेदन सादर केले. या रस्त्यावर शेकडो प्रवाशांचे बळी गेले असल्याचे लंके यांनी मंत्री गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले. याच मार्गाने शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातील भाविक जात असतात. या भाविकांनाही खराब रस्त्यामुळे मनःस्ताप सहन करावा लागत असल्याचेही लंके यांनी गडकरी यांना सांगितले. त्यावर गडकरी यांनी पुढील आठवडयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या. या बैठकीस  खा. लंके हे देखील उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *